Home राजकारण शरद पवार-सुनील तटकरे यांची भेट

शरद पवार-सुनील तटकरे यांची भेट

माजी मंत्री अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा असतानाच शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलला अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळला आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशमुख दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ”शरद पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. तेथे सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले,” असा दावा देशमुख यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ४ जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज होतील. कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशात २०० जागा पार सुद्धा महायुती जिंकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जितक्या जास्त सभा होतील तितका महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. मोदींनी जास्त सभा घ्याव्यात जेणेकरून महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल, असा टोला त्यांनी देशमुख यांनी लगावला. मुख्यमंत्री यांच्या बॅग तपासणीवर टीका करताना ते म्हणाले की, आधी आलेल्या बॅगांवर संशय होता म्हणून यावेळी चौकशीचे नाटक केले. मुख्यमंत्र्यांनी केवळ देखावा केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात जोरात सुरू आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनीही भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती.

देशमुखांचा दावा फेटाळला

अनिल देशमुख यांचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेटाळला आहे. मी आणि शरद पवार एकाच हॉटेलला नाशिकमध्ये मुक्कामाला होतो. मात्र, तटकरे यांची भेट झाली नसल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काही वेळापूर्वीच तटकरे नाशिकहून पालघरच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळच्या मुंबईतल्या महायुतीच्या सभेसाठीदेखील ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.