Home जिल्हा WCBTRL टोल कंपनीचा कारभार आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ; शिवसेना कामगार सेनेचा प्रशासनाला...

WCBTRL टोल कंपनीचा कारभार आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ; शिवसेना कामगार सेनेचा प्रशासनाला तडाखेबंद सवाल!

वरोरा :- चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदाोरी येथील टोल वसुली करणाऱ्या WCBTRL टोल कंपनी च्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा एररवर आणत शिवसेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. माजी जिल्हा प्रमुख कामगार सेना (वरोरा-भद्रावती) श्री. सुयोग भोयर यांनी पत्रकार परिषद घेत टोल कंपनीच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला असून, प्रशासनाला थेट आणि गंभीर प्रश्न विचारले आहेत. याच मुद्द्यावर आक्रमक होत शिवसेना चंद्रपूर संघटक तथा वरोरा नगर परिषदेचे बांधकाम सभापती  मनीष जेटानी व निखिल मांडवकर
जिल्हाप्रमुख युवासेना, चंद्रपुर यांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.



कोट्यवधींची वसुली, पण मूलभूत सुविधा शून्य!
वर्ष २०११ पासून नंदाोरी येथील चंद्रपूर-नागपूर मार्गाची देखभाल व टोल वसुलीची जबाबदारी WCBTRL कंपनीकडे आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची नियमित देखभाल केली जात नाही. रस्त्यावरील खड्डे कायम असून वाहनचालकांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. कोट्यवधी रुपयांची घसघशीत टोल वसुली होत असताना, प्रत्यक्षात नागरिकांना करारानुसार मूलभूत सुविधा मिळत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे? महामार्गावर रुग्णवाहिका (अम्बुलन्स), क्रेन, प्राथमिक उपचार, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा कागदावरच असून प्रत्यक्षात त्या गायब असल्याचे दिसून येते.



अपघातांना जबाबदार कोण? मृतांच्या कुटुंबांना न्याय कधी?
रस्त्याच्या निकृष्ट दर्जा आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या निष्काळजीपणामुळे गेलेल्या जिवांना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सुयोग भोयर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अपघातात मृत पावलेल्या किंवा जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याबाबत टोल कंपनीकडून सातत्याने टाळाटाळ का केली जात आहे, असा परखड सवालही त्यांनी विचारला.



नियमभंग करणाऱ्यांवर दुजाभाव का? RTO कारवाईवर प्रश्नचिन्ह.
नुकत्याच २७ ऑगस्ट रोजी नंदाोरी टोल परिसरात RTO (प्रादेशिक परिवहन विभाग) ने कंपनीशी संबंधित वाहनांवर कारवाई केली होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते, मग मूळ जबाबदार असणाऱ्या आणि रस्ते सुरक्षेचा बोजवारा उडवणाऱ्या टोल कंपनीवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल करत शिवसेनेने यंत्रणेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.



💥 प्रशासनाला शिवसेनेचे थेट ६ खडे सवाल 💥
1. टोल कंपनीवर वारंवार तक्रारी होऊनही ठोस आणि कठोर कारवाई का केली जात नाही?
2. अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना नेमकी भरपाई कोण देणार?
3. कंपनीच्या स्पष्ट निष्काळजीपणाची जबाबदारी का निश्चित केली जात नाही?
4. संबंधित अधिकारी टोल कंपनीवर कारवाई करण्यास का घाबरत आहेत?
5. या अधिकाऱ्यांच्या मागे नेमकं कोणाचा दबाब किंवा वरदहस्त आहे?
6. कोट्यवधी रुपयांची टोल वसुली करूनही नागरिकांना मूलभूत सुविधा का दिल्या जात नाहीत?



शिवसेनेची आक्रमक मागणी व आंदोलनाचा इशारा 
👉  टोल कंपनीच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
👉  रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती केली जावी आणि अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना न्याय व योग्य भरपाई मिळवून दिली जावी.
जनतेच्या जिवाशी खेळ करून चालणारी टोल वसुली खपवून घेतली जाणार नाही, प्रशासनाने आता जनतेला याचे स्पष्ट उत्तर द्यावे, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख सुयोग भोयर यांनी दिला आहे. तसेच, याप्रकरणी शिवसेना चंद्रपूर संघटक तथा वरोरा नगर परिषदेचे बांधकाम सभापती  मनीष जेटानी यांनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचे ठरवले असून, लवकरच जनक्षोभ रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे.