Home जिल्हा लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.

लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.

वरोरा :-येथील लोकमान्य महाविद्यालयात २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि टग ऑफ वॉर (दोरी खेच) या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या सर्वच स्पर्धांमध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व उच्च क्रीडाभावनेने सहभाग नोंदविला.



महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राखे सर, नवले सर व डॉ. लोणकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आयुष्यात क्रीडाभावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम देऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे व स्पर्धांचे अचूक नियोजन करण्यात आले. त्यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे क्रीडा दिनाचे कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक मोठी जागरूकता निर्माण झाली असून, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व क्रीडाप्रेमींनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.