वरोरा :-‘स्वच्छ वरोरा, सुंदर वरोरा’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे हात अहोरात्र शहराची स्वच्छता करतात, त्या हातांची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता वरोरा नगर परिषदेच्या वतीने सर्व स्वच्छतादूतांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
शहराच्या स्वच्छतेसाठी पाऊस असो वा कडक ऊन, आपले सफाई कर्मचारी न थकता कर्तव्य बजावतात. त्यांच्या या निष्ठावान सेवेला सलाम करत, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे संततधार पावसातही कर्मचाऱ्यांना कोणताही अडथळा न येता आपले काम अधिक सुरक्षितपणे करता येईल.
या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष सौ. अर्चना आशिष ठाकरे यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अथक परिश्रमाचा गौरव करत त्या म्हणाल्या, “आपले शहर स्वच्छ ठेवणारे हे हात सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या या अविरत सेवेला आमचा मानाचा मुजरा.”
यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. बंडूजी देऊळकर, श्री. राहुल देवळे, सौ. सुषमाताई चांभारे, सौ. लताताई हिवरकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या या स्वच्छतादूतांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्यामुळे नगरपरिषदेच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.




