वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि शासनाच्या जनहितकारी योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी यावर भर देत, आज वरोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांची विशेष उपस्थिती होती.
💠 योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर 💠
बैठकीत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या सद्यस्थितीचा आणि अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने, प्रशासनाने या कामाला गती देण्याचे निर्देश आमदार महोदयांनी दिले. यासोबतच, पात्र लाभार्थ्यांना घरकुल पट्टे वाटपाच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून ती प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जनसेवेचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्यावर आणि शासनाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर चर्चा झाली.
💠 लोकप्रतिनिधींचा ‘आक्रमक’ पवित्रा 💠
मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत आमदार करणदादा देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के व ईतर कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य असून, प्रशासनाने गांभीर्याने काम करावे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे वरोरा-भद्रावती क्षेत्रातील प्रलंबित कामांना आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




