चंद्रपूर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या आक्रमक मध्यस्थीने डीजे बंदीचा तिढा सुटला; आता नियमांच्या चौकटीत होणार गणेशोत्सव डीजेवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे गणेश मंडळांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्काळ दखल घेत गणेश मंडळे, गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या आक्रमक मध्यस्थीमुळे डीजे बंदीचा पेच सुटला असून, यंदाच्या गणेशोत्सवात अटी व शर्तींचे पालन करून मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी प्रशासनाने आखून दिलेले कठोर नियम व अटी 👇👇👇
डीजे परवानगी :- यंदाच्या गणेशोत्सवात अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आवाजाचे प्रमाण :- डीजे वाजवताना आवाजावर मर्यादा राखणे सक्तीचे आहे, म्हणजेच अत्यंत मर्यादित आवाजातच डीजे वाजवण्यास परवानगी असेल.
प्रतिबंध :- मोठ्या साऊंड सिस्टिमचा वापर आणि अत्यंत मोठा (High Decibel) आवाज वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
नियम पालन :-ध्वनीप्रदूषणाचे सर्व नियम पाळणे आयोजकांसाठी बंधनकारक आहे.
स्वयंघोषणापत्र अनिवार्य :-संबंधित गणेश मंडळ किंवा डीजे मालकांनी पोलीस प्रशासनाकडे स्वयंघोषणापत्र सादर करणे आता अनिवार्य असेल.
जबाबदारी :- केवळ डीजे वाजवण्यावरच नव्हे, तर ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची (गणेश मंडळ/डीजे मालक) राहील.
“श्रद्धेचा उत्सव शिस्तीत साजरा करा” – आमदार किशोर जोरगेवार
या निर्णयावर भाष्य करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, “गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करणे आवश्यक आहे”.
प्रशासनाने गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांचा आदर करत आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत हा निर्णय घेतला आहे. आता चंद्रपूरकर भाविक नियमांचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज झाले आहेत.




