Home विदर्भ पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण: ९ पोलिसांना जन्मठेप; १५ वर्षांनंतर पीडित कुटुंबाला मिळाला...

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण: ९ पोलिसांना जन्मठेप; १५ वर्षांनंतर पीडित कुटुंबाला मिळाला न्याय

वाशिम :-पोलीस कोठडीत आरोपी ‘बेग्या पवार’ याच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल देत नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यामुळे संपूर्ण राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.




ही घटना सन २०११ मधील आहे. रिसोड पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासासाठी बेग्या पवार याला ९ मे २०११ रोजी पहाटे ३:३० वाजता ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या शरीरावर ४३ गंभीर जखमा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जखमी बेग्याला वाशिम येथे रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांवर कोठडीत अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला होता.




💠 न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल 💠
या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला होता. सीआयडीचे उपअधीक्षक अन्वर शेख, उपअधीक्षक चव्हाण आणि त्यांच्या पथकाने सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात ४७ साक्षीदार तपासण्यात आले.
वाशिम जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी सर्व पुरावे आणि वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन नऊ आरोपींना दोषी ठरवले. शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये तत्कालीन ठाणेदार माधव माणिकराव धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश सीताराम ताराम, नागोराव भगवान खंडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कनीराम जाधव यांचा समावेश आहे.
न्यायालयाने या सर्वांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.




💠 कायद्याचा धाक 💠
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, बेग्या पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता. कोणत्याही गुन्ह्याची सिद्धता नसताना कायदा हातात घेऊन कोठडीत अमानुष छळ करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. न्यायालयाने खून, कबुलासाठी छळ करणे, गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी कारस्थान रचणे या कलमांन्वये ही शिक्षा सुनावली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील ९ कर्मचाऱ्यांना मिळालेली ही कठोर शिक्षा पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.