Home जिल्हा वरोऱ्यात निसर्गाचा कोप: वादळी वाऱ्यामुळे पिंपळाचे झाड घरांवर कोसळले; मोठी दुर्घटना टळली

वरोऱ्यात निसर्गाचा कोप: वादळी वाऱ्यामुळे पिंपळाचे झाड घरांवर कोसळले; मोठी दुर्घटना टळली

वरोरा :- वरोरा शहरात २२ जून रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, कॉलरी वॉर्ड परिसरात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. कल्यानेश्वर हनुमान मंदिरामागील अनेक वर्षे जुने महाकाय पिंपळाचे झाड अचानक उन्मळून दशरथ किटे यांच्या घरावर कोसळले. या घटनेत तीन घरांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाच्या धिम्या कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.




💠 तीन घरांचे अतोनात नुकसान 💠
सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, परिसरातील पिंपळाचे जुने झाड मुळासकट उखडले गेले. हे झाड थेट दशरथ किटे यांच्या घरावर कोसळल्याने घराचे छप्पर आणि भिंतींचे गंभीर नुकसान झाले. याशिवाय शेजारील मंदा नैताम आणि गोविंदा बावणे यांच्या घरांनाही या घटनेचा मोठा फटका बसला आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु घरांचे छप्पर आणि सामानाचे प्रचंड नुकसान झाल्याने कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.




💠प्रशासनाची तत्परता आणि स्थानिकांचा रोष💠
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासन आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ झाड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, शहरात अशी जुनी आणि धोकादायक झाडे असताना प्रशासनाने वेळेत छाटणी का केली नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.




💠 भाजप नेत्यांची तातडीने मदतीची मागणी 💠
या घटनेनंतर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष रमेशजी राजुरकर, सुरेश महाजन, माजी नगराध्यक्ष विनोदजी लोकरे, प्रकाश दुर्गपुरोहित आणि संजय दानव यांनी उपस्थित राहून नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले.
यावेळी भाजप नेत्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. “नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. प्रशासन केवळ पंचनामे करून मोकळे न होता, शासनाकडून तातडीने नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत आणि योग्य भरपाई मिळवून द्यावी,” अशी आक्रमक मागणी भाजप शिष्टमंडळाने केली आहे. जर नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी नेत्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे वरोरा शहरातील धोकादायक झाडांच्या छाटणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.