Home Breaking News नियम धाब्यावर बसवून ‘बार’चा धिंगाणा; वरोरामध्ये प्रशासनाचा डोळा असूनही आंधळेपणा!

नियम धाब्यावर बसवून ‘बार’चा धिंगाणा; वरोरामध्ये प्रशासनाचा डोळा असूनही आंधळेपणा!

वरोरा :- एकीकडे शासनाने मद्यविक्री आणि बार-रेस्टॉरंटसाठी स्पष्ट नियमावली घालून दिली असताना, वरोरा तालुक्यात मात्र नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. सकाळी १० ते रात्री ११ ही वेळ निश्चित असताना, अनेक बार सकाळी आठ वाजल्यापासूनच आपले दुकान थाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  केवळ वेळेचेच उल्लंघन नाही, तर ‘ड्राय डे’च्या दिवशीही मद्यविक्री सुरू असल्याच्या गंभीरता समोर येत आहेत.
प्रशासनाचे मौन, नागरिकांमध्ये संताप!
सामान्य नागरिकांच्या नजरेसमोर सर्रास सुरू असलेल्या या अवैध धंद्यांकडे  राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बारमुळे मद्यधुंद वाहनचालक, ध्वनी प्रदूषण आणि भांडण-तंट्यांच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोठा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ?
एखादी मोठी अनुचित किंवा विध्वंसक घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. तालुक्यात तस्करी व अवैध दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असूनही प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन या बार मालकांवर कारवाई करणार का, की तक्रारींकडे दुर्लक्ष करून आणखी मोठ्या संकटाला आमंत्रण देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.