चंद्रपूर :- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सिंदेवाही शहरात केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत मुख्य तस्कराला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी धाडसी कामगिरी करत अवैध धंद्यांवर वचक निर्माण केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरात असलेल्या एका लपवलेल्या जागेवर अचानक छापा टाकला. या कारवाईत सागर प्रमोदराव केकरे (वय ३४, रा. आझाद चौक, सिंदेवाही) याला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशाचा तब्बल २,८४,८४५ (दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे पंचेचाळीस) रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास
आरोपी सागर केकरे याला पुढील कारवाईसाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये आणि भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठादारांचा शोध पोलीस घेत असून, सिंदेवाही पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पोलीस प्रशासनाचा धडाका
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या धाडसी मोहिमेत सपोनि श्री. दीपक काँक्रेटवार, पोउपनि श्री. विनोद भुरले, पोउपनि श्री. सर्वेश बेलसरे
- पोहवा: गणेश मोहर्ले
- पोहवा: गणेश भोयर
- पोहवा: चेतन गज्जिलवार
- पोहवा: संतोष पेलपुलवार
- पोहवा: जयसिंग
- पोहवा: सचिन गुरुनुले
- पो. अं.: सुमित बरडे
- पो. अं.: अजित शेंडे
- (स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर)तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
चंद्रपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात आणि परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.




