Home Breaking News दिडोडा बॅरेज प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे मरणदारात रस्ते; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!

दिडोडा बॅरेज प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे मरणदारात रस्ते; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!

वरोरा  :- दिडोडा बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी सुरू असलेल्या बेजबाबदार जड वाहतुकीमुळे दिडोडा-बामर्डा-माढेळी हा मुख्य रस्ता पूर्णपणे खचला असून, हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेत प्रकल्पाची जड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासनाचा निष्काळजीपणा
दिडोडा, बामर्डा आणि माढेळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, प्रकल्पाच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी चालवणे कठीण झाले असून, नागरिकांचे जीव धोक्यात घालून सुरू असलेली ही वाहतूक अत्यंत निष्काळजीपणाची असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांचा इशारा: अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ?
👉 पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वी माढेळी मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरूस्त करण्यात यावा.

👉  रस्ता सुरक्षित होईपर्यंत प्रकल्पाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी.

👉 जर याकडे दुर्लक्ष करून एखादा अपघात, जीवितहानी किंवा वित्तहानी झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी दिडोडा बॅरेज प्रकल्प प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची राहील.

निवेदन सादर करते वेळी माजी सैनिक सचिन धात्रक,  महेश देवतळे, विक्रम चंदनखेडे वैभव देवतळे  ,चेतन किन्हेकार,  राहुल वाघ, प्रदीप देवतळे ,अंकित सातपुते, सुरेश ढोके, उपस्थित होते

अशी घटना घडल्यास तीव्र आंदोलन, आणि  मोर्चा काढण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा खणखणीत इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.