वनी :- जीर्ण वीजवाहिन्या बदलण्यासाठी आणि बोर्डा गावातील वीज कपातीविरोधात फाल्गुन गोहोकार यांचे पांढरकवडा अभियंत्यांना निवेदन ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास जनआंदोलन छेडणार; कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावर वणी उपविभागातील वीज पुरवठ्याची आणि पायाभूत सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी महावितरणच्या पांढरकवडा विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दोन स्वतंत्र निवेदने देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ८ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र ठिय्या व जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पहिल्या निवेदनात फाल्गुन गोहोकार यांनी वणी उपविभागातील जीर्ण वीजवाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. नियमानुसार २५ वर्षांनंतर वीजवाहिन्या (तारा) बदलणे बंधनकारक असतानाही, प्रशासनाने त्या अद्याप बदललेल्या नाहीत. या जीर्ण आणि लोंबकळणाऱ्या तारा नागरिकांच्या हाताला लागतील इतक्या खाली आल्या आहेत. यामुळे वणी उपविभागात आजवर अनेक मोठे अपघात घडून जीवित व वित्तहानी झाली आहे. अतिशय किरकोळ कारणांमुळे ग्रामीण व शहरी भागातील वीज प्रवाह तासनतास बंद केला जातो, तर कित्येक गावे सलग ४ ते ८ दिवस अंधारात चाचपडत आहेत. नियमित बिल भरूनही नागरिकांना अशी निकृष्ट दर्जाची सेवा का? असा सवाल करत येत्या ८ दिवसांत संपूर्ण वीजवाहिन्यांची सखोल तपासणी करून नवीन तारा टाकण्याची मागणी गोहोकार यांनी केली आहे.
बोर्डा गावावर महावितरणचा अन्याय; वीज पुरवठा ८ तासांवरून ६ तासांवर!
2) दुसऱ्या निवेदनात घोन्सा सब-स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मु.पो. बोर्डा (ता. वणी) येथील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. बोर्डा गावासाठी अधिकृत नियमांनुसार आधी ८ तासांचा वीजपुरवठा लागू होता. मात्र, गेल्या महिन्यापासून कोणताही पूर्वइशारा न देता तो अवघ्या ६ तासांवर आणण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेजारील गावांना नियमितपणे १० तास वीजपुरवठा केला जात असताना, बोर्डा गावातील शेतकऱ्यांना केवळ ६ तास वीज देऊन महावितरण उघड दुजाभाव करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी व इतर कामांसाठी नियमित ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच वाहिन्यांमध्ये बिघाड (ब्रेकडाऊन) झाल्यास कर्मचाऱ्यांकडून होणारी दिरंगाई थांबवून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. येत्या ८ दिवसांच्या आत वणी उपविभागातील जीर्ण तारा बदलून वीजपुरवठा सुरळीत करावा आणि बोर्डा गावाचा वीजपुरवठा १० तास करून रात्री सिंगल फेजची व्यवस्था करावी,” अशी स्पष्ट मागणी फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे. या मुदतीत सकारात्मक पावले न उचलल्यास मनसेच्या वतीने महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र ठिय्या व जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान वणी उपविभागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही मनसेने दिला आहे. निवेदन देतेवेळी असंख्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रतिलिपी यवतमाळचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वणीचे पोलीस निरीक्षक, तसेच झरी झोनचे उपविभागीय अभियंता आणि घोन्साचे शाखा अभियंता यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
Home Breaking News महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक; वणी उपविभागात तीव्र आंदोलनाचा इशारा




