नागपूर :- पेट्रोल पंपावर इंधन भरताना ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ने पुढाकार घेतला आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सहसचिव विलास ठोसर यांनी केले आहे.
पेट्रोल भरताना काय काळजी घ्यावी ?
पेट्रोल पंपावर इंधन भरताना ग्राहकांनी खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे:
👉 इंधन भरण्यापूर्वी मीटर रीडिंग शून्य (0) वर असल्याची खात्री करा.
👉 इंधनाची डेंसिटी (घनता) योग्य असल्याची तपासणी करा; चुकीची डेंसिटी भेसळीचे लक्षण असू शकते.
👉 मीटर रीडिंग 8-10 पासून सुरू होत असेल, तर ती फसवणूक असू शकते, कारण मीटर नेहमी शून्यापासूनच सुरू होणे आवश्यक आहे.
👉 नोझल ‘ऑटो-कट’ झाल्याशिवाय काढू नका आणि पेट्रोल भरताना ते सतत प्रवाहात येत असल्याची खात्री करा.
👉 इंधन भरल्यानंतर बिल घ्यायला विसरू नका.
मिळणाऱ्या मोफत सुविधा :-
ग्राहकांना पेट्रोल पंपावर काही मूलभूत सुविधा मोफत मिळण्याचा अधिकार आहे. यामध्ये हवा (साधी व नायट्रोजन), पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग पॉइंट, प्राथमिक उपचार पेटी (First Aid) आणि तक्रार पुस्तकाची (Complaint Book) उपलब्धता यांचा समावेश आहे.
तक्रार कुठे करावी ?
जर पेट्रोल कमी मिळत असेल किंवा भेसळीचा संशय असेल, तर ग्राहक खालील ठिकाणी तक्रार करू शकतात:
👉 पेट्रोल पंप व्यवस्थापक किंवा संबंधित तेल कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक.
👉 जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा ग्राहक निवारण मंच (District Consumer Forum).
ऑनलाईन पोर्टल :-www.consumerhelpline.gov.in किंवा टोल फ्री क्रमांक :- 1800-11-4000.
‘जागरूक ग्राहक – सुरक्षित ग्राहक’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ग्राहकांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.




