Home Breaking News सावधान! चंद्रपुर जिल्ह्यात आरोग्याशी खेळणाऱ्या ‘बोगस’ डॉक्टरांचे पेव; प्रशासनाचा ‘डोळा’ कधी उघडणार...

सावधान! चंद्रपुर जिल्ह्यात आरोग्याशी खेळणाऱ्या ‘बोगस’ डॉक्टरांचे पेव; प्रशासनाचा ‘डोळा’ कधी उघडणार ?

चंद्रपूर :-पावसाळ्याच्या तोंडावर तापासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असताना, ग्रामीण भागातील गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अनेक नागरिक तातडीच्या उपचारासाठी ‘बोगस’ डॉक्टरांच्या जाळ्यात अडकत असून, त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत.
प्रशासनाचा ‘सपाटा’ हवा:
महाराष्ट्र शासनाने बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. वैद्यकीय नोंदणी नसलेल्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करणे, दवाखाने सील करणे आणि प्रमाणपत्र तपासणे अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. तरीही, स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाने ग्रामीण भागात विशेष जनजागृती मोहीम राबवणे, नियमित तपासण्या करणे आणि संशयित बोगस डॉक्टरांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
नागरिकांनो, स्वतःच व्हा सतर्क!
आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून, आता प्रशासनासोबतच नागरिकांनीही सतर्क राहण्याची वेळ आली आहे. कोणत्याही डॉक्टरकडे उपचार घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय पदवी, नोंदणी क्रमांक आणि पात्रता तपासणे आवश्यक आहे. क्लिनिकमध्ये वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित आहे का, याची खात्री करा. जर तुम्हाला काही संशयास्पद वाटले, तर त्याची माहिती तातडीने आरोग्य विभाग किंवा प्रशासनाला द्या.
मागणी जोर धरतेय…
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच या बोगस डॉक्टरांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.