वरोरा :- प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. पाण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून पायपीट करणाऱ्या महिलांचा संयम आज सुटला. संतप्त महिलांनी केवळ प्रशासनाचा घेरावच घातला नाही, तर कुसुम देवानंद वैद्य या महिलेने थेट तहसील कार्यालयामागील टॉवरवर चढून प्रशासनाला धारेवर धरले. या ‘शोले’ स्टाईल आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
💧पाणी नाही, तर खाली येणार नाही !
मिळालेल्या माहितीनुसार, बेलगावमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. संतापाचा उद्रेक इतका तीव्र होता की, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही, अशी आक्रमक भूमिका कुसुम वैद्य यांनी घेतली.
👉 प्रशासनाची पळापळ
एका महिलेने थेट टॉवर गाठल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच महसूल आणि पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या घेराव आणि टॉवरवरील आंदोलनामुळे तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
👉 मुख्य मुद्दे :-बेलगावमध्ये पाण्यासाठी हाहाकार; प्रशासन सुस्त.कुसुम वैद्य यांचे टॉवरवर चढून जीवघेणे आंदोलन.
“जोपर्यंत लेखी आश्वासन नाही, तोपर्यंत माघार नाही”
👉 वरोरा तहसील परिसरात नागरिकांची मोठी गर्दी.
“आम्ही जगायचं कसं? पाण्यासाठी महिलांना वनवण भटकावं लागतंय. प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्हाला असेच टोकाचे पाऊल उचलावे लागेल,” असा संतप्त सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




