Home विदर्भ वरोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; ‘समता, स्वातंत्र्य...

वरोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; ‘समता, स्वातंत्र्य आणि न्याय’ या मूल्यांचा जागर 

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज दि. १४ एप्रिल २०२६ रोजी वरोरा येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहराच्या मुख्य भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास विनम्र अभिवादन केले.
-: मान्यवरांची उपस्थिती :-
कार्यक्रमाचे औचित्य साधून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे , काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण काकडे , वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी, काँग्रेस व इतर राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि भीम अनुयायी, व नगरपरिषद वरोरा चे संपूर्ण नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘कोटी कोटी प्रणाम’ केले.
-: सामाजिक उपक्रमांतून अभिवादन :-
केवळ औपचारिकता न पाळता, बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते:
👉 रक्तदान शिबिर :-‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्रिसूत्रीचे स्मरण करत युवकांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे (ब्लड कॅम्प) आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
👉 महाप्रसाद :- जयंतीनिमित्त उपस्थित जनसमुदायासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला.
👉 भव्य मिरवणूक :- वरोरा शहरातील प्रत्येक प्रभागातून (वार्डातून) ढोल-ताशांच्या गजरात आणि निळ्या पाखरांच्या उत्साहात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. “जय भीम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
👉 समतामूलक भारताचा संकल्प
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून उभा आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण करून समतामूलक आणि प्रगत भारत घडवण्याचा संकल्प या दिनी सर्वांनी केला.
वरोरा येथील या सोहळ्याने समाजातील एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडवले असून, अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा जयंती उत्सव संपन्न झाला.

🙏 जय विदर्भ🙏