आनंद निकेतन महाविद्यालयास विदेशातील पाहुण्यांची सदिच्छा भेट; सामाजिक-शैक्षणिक कार्याचे कौतुक
वरोरा :- अभिषेक किशोरराव भागडे
महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालयास फ्रान्स, जर्मनी आणि इटली येथील विदेशी अभ्यागतांनी अलीकडेच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पाहुण्यांनी आनंदवन प्रकल्पासह महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची सविस्तर पाहणी करून संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व प्रशंसा व्यक्त केली.
विदेशी प्रतिनिधीमंडळाने सर्वप्रथम आनंदवन प्रकल्पाला भेट देत तेथील सामाजिक पुनर्वसन, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबन उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकासभाऊ आमटे यांची भेट घेऊन आनंदवनच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजाभिमुख प्रकल्पांवर चर्चा केली.
यानंतर पाहुण्यांनी आनंद निकेतन महाविद्यालयात भेट देत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसह इयत्ता अकरावी–बारावी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेतली. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रशासकीय विभाग, तसेच विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी विशेष रस व्यक्त केला.
या प्रसंगी आनंदवनातील अतिथी समन्वयक व योग शिक्षक श्री. दीपक शिव यांनी विदेशी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरविंद बरडे आणि डॉ. प्रशांत वाघ यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती, अभ्यासक्रमांची रचना, विद्यार्थी उपक्रम आणि यशस्वी प्रकल्पांची माहिती सादर केली.
विदेशी पाहुण्यांनी विद्यापीठस्तरावर गौरव प्राप्त विद्यार्थी, शिक्षकांची कामगिरी तसेच क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याची त्यांनी दखल घेत विशेष अभिनंदन केले.
या वेळी प्रभारी प्राचार्य व ग्रंथपाल डॉ. संजय साबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. रामदास कामडी, प्रा. तिलक ढोबळे, प्रा. हेमंत परचाके, अधीक्षक देवानंद अलोणे, वरिष्ठ लिपिक कमलाकर डुकरे, ग्रंथालय लिपिक मनीषा मनगटे, हिना पांडे, संतोष गुंतीवार, चेतन नागदेवते, संकेत कायरकर, निखिल डुकरे, हर्षल लंगडे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या मनोगतांना प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे व जिज्ञासू वृत्तीचे त्यांनी विशेष कौतुक केले. समाजासाठी आदर्श ठरणारे आनंदवन व आनंद निकेतनचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
🙏 जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




