पुणे12 जून :- ससून रुग्णालयातील काही डाॅक्टर खासगी मेडिकलवाल्यांसाेबत मिळून गाेरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया याेजनेतून माेफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकलमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्युराेसर्जरी विभागातील एका निवासी डाॅक्टरने तब्बल २४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ समाेर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पाेलिस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डाॅक्टरने दिली आहे.
काेंढव्यातील सय्यदनगर भागात एक विधवा महिला असून, तिच्या १७ वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली. त्याचा डिस्चार्ज करतेवेळी मात्र न्युराेसर्जरी विभागातील निवासी डाॅ. किरण याने त्यांना २४ हजार ५०० रुपयांचे किट मेडिकल तेजपाल मेडिकलमधून आणण्यास सांगितले. तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी काेंढव्यातील जुबेर मेमन या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या लाेकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डाॅक्टर हा रुग्णाच्या नातेवाइकांना पैसे मागताना दिसत आहे. यामुळे गरीब रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांची साखळीच असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर आता ससूनचे अधिष्ठाता नेमकी काय कारवाई करतात? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.




