नागपूर :- सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाच्या बळावर नागपूरच्या सुपुत्रिने देशाची मान उंचावली आहे. नागपूरची हरहुन्नरी तरुणी आर्या अवधूत हिने प्रतिष्ठेचा ‘मिस अर्थ इंडिया २०२६’ (Miss Earth India 2026) हा मानाचा किताब आपल्या नावावर करत संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे.
प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धा जिंकून नागपुरात परतलेल्या आर्याचे विमानतळावर अत्यंत उत्साहात, वाजत-गाजत आणि ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, चाहते आणि नागपूरकरांनी तिला प्रेमाचा वर्षाव करत पुष्पहार व मिठाई भरवून तिचे जोरदार अभिनंदन केले.
पर्यावरण रक्षण आणि सामाजिक जाणिवांचा संदेश देणाऱ्या या जागतिक पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने मिळवलेले हे यश केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण देशातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आर्याने आपल्या भावना व्यक्त करत या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. आर्याच्या या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण नागपुरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




