Home विदर्भ बाभुळगाव, यवतमाळ व नेर तालुक्यात शेतबांधावर मंत्र्यांची पाहणी; करपणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप...

बाभुळगाव, यवतमाळ व नेर तालुक्यात शेतबांधावर मंत्र्यांची पाहणी; करपणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व चिंतेचे वातावरण

पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ,आमदार राजू तोडसाम व किसन वानखेडे यांनी घेतला थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा

यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) :- यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस आणि तूर ही उभी पिके करपून चालली असून अनेक शेतांमध्ये पिकांची वाढ खुंटली आहे. हवामान बदलामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू तडसाम आणि आमदार किसन वानखेडे यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये दाखल झाले.

शेतकऱ्यांची आक्रमक आकडेवारी आणि व्यथा:

दौऱ्यादरम्यान बाभुळगाव, यवतमाळ व नेर या तिन्ही तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. पिकांची सद्यस्थिती, जमिनीतील ओलाव्याची कमतरता आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या भयानक अडचणींबाबत मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी संताप व व्यथा मांडल्या.

  • सोयाबीनची पांढरी पडणे, शेंगा न भरणे आणि पिके वाळू लागणे.
  • कापसाची वाढ पूर्णपणे थांबणे.
  • तुरीच्या पिकावरही गंभीर परिणाम झाल्याची हाहाकार माजवणारी परिस्थिती. अनेक ठिकाणी शेतकरी महिलांनीही आपल्या बांधावरच मंत्र्यांना घेराव घाकत तात्काळ आर्थिक मदतीची आक्रमक मागणी केली. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील करपलेल्या पिकांची पाहणी करून स्थितीची नोंद घेतली व कृषी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागितली.

प्रशासनाला सक्त व आक्रमक सूचना.

यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या, परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याच्या आणि तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सक्त सूचना मंत्र्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळावा, पीकविमा दाव्यांची तपासणी अत्यंत जलद गतीने केली जावी आणि या बिकट संकटाच्या काळात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कसूर न सोडता संवेदनशीलपणे काम करावे, असा स्पष्ट इशारा मंत्र्यांकडून देण्यात आला.

बळीराजासमोर अद्यापही मोठे संकट कायम.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी हा दौरा तात्पुरता दिलासादायक ठरला असला, तरी आता लवकरात लवकर पाऊस न झाल्यास चालू खरीप हंगामावर आणखी भीषण संकट ओढवण्याची दाट भीती शेतकरी वर्गाकडून तीव्र शब्दांत व्यक्त केली जात आहे.