Home जिल्हा जय भारतीय गणेश मंडळातर्फे वरोऱ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ६१ जणांचे रक्तदान!

जय भारतीय गणेश मंडळातर्फे वरोऱ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ६१ जणांचे रक्तदान!

वरोरा :- गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरेला कायम राखत जय भारतीय गणेश मंडळ, वरोरा यांच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्थानिक मोठे विठ्ठल मंदिर प्रांगणात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला. नागपूरच्या सुप्रसिद्ध हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात ६१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक दायित्व सिद्ध केले. त्यांना गिफ्ट म्हणून वॉटर कॅन प्रमाणपत्र देण्यात आले आहे.



कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून करण्यात आली. यावेळी उपस्थित रक्तदात्यांचा उत्साह अभूतपूर्व असा होता. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या महायज्ञात सहभाग घेतला.सदर शिबिराचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष पवन बुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. याप्रसंगी मंडळाचे सचिव योगेश डोंगरवार,ललित डोंगरवार, अक्षय बडसर, मिंकू शर्मा, नरेश बरातलवार, रवी बुजाडे, शैलेश नक्षीने, प्रज्वल लोहकरे, मॉंटी पटेल, आदित्य कोलतेवार, बल्लू खडसान, श्री डोंगरवार, प्रकाश गांगुर्डे आणि मधुकर वेलेकर यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांच्या अफाट गर्दीने आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने हे शिबिर वरोरा शहरात कौतुकाचा विषय ठरले.



समाजसेवेचा वसा:-” जय भारतीय गणेश “मंडळातर्फे राबविले जाणारे इतर कार्य

जय भारतीय गणेश मंडळ केवळ गणेशोत्सवापुरते मोजके नसून, वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून वरोरा शहरात अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून ओळखले जाते. मंडळाचे कार्य खालीलप्रमाणे आहे

👉 मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे: दरवर्षी नागरिकांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा व मोतीबिंदू तपासणी शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत व चष्मे वाटप केले जाते.

👉 शैक्षणिक साहित्य वाटप व गुणगौरव: परिसरातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शालेय साहित्य, दप्तर व वही-पुस्तकांचे नियमित वाटप केले जाते. तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोohla आयोजित करून त्यांचे मनोबल वाढवले जाते.

👉 वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण: ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वरोरा शहर व परिसर हरित करण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांद्वारे घेतली जाते.

👉 आपत्कालीन मदत व सामाजिक जाणीव: नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा शहरात गरज पडेल तेव्हा रक्तदात्यांची फळी उभी करणे, गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य कीट व आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात हे मंडळ नेहमीच अग्रेसर असते.