चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘सहकारमहर्षी स्व. बाबासाहेब वासाडे सहकार सप्ताह २०२६’ चा शुभारंभ
चंद्रपूर, १९ सप्टेंबर :- सहकार क्षेत्राचे दीपस्तंभ, आदरणीय स्व. ॲड. बाबासाहेब वासाडे यांच्या विचारांचा वारसा जोपासत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील मा. सा. कन्नमवार सभागृहात आज ‘सहकारमहर्षी स्व. बाबासाहेब वासाडे सहकार सप्ताह २०२६’ (१९ ते २५ सप्टेंबर) चा दिमाखदार शुभारंभ झाला.
या कार्यक्रमात स्व. बाबासाहेबांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांच्या अर्धांगिनी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती वैशालीताई वासाडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, बाबासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या सहकारनिष्ठ सहकार्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. याशिवाय, गरजू लाभार्थींना चारचाकी वाहने आणि महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे धनादेशांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी बँक सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मुख्य आवारात उभारला जाणार भव्य पूर्णाकृती पुतळा भावी पिढीला स्व. बाबासाहेबांच्या कार्याची सदैव प्रेरणा मिळावी, यासाठी बँकेच्या मुख्य आवारात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच, दरवर्षी त्यांची जयंती ‘सहकार सप्ताह’ म्हणून साजरी करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय बँकेने घेतला आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार व बँकेच्या संचालिका मा. ना. प्रतिभाताई धानोरकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर चिमूरचे लोकप्रिय आमदार मा. कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर, आमदार मा. सुधाकरजी अडबाले, जिल्हा उपनिबंधक मा. जयसिंग ठाकूर, ओबीसी नेते मा. अशोकजी जीवतोडे, मा. संजयजी वासाडे, बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व उपाध्यक्ष मा. संजयजी डोंगरे, मानद सचिव मा. अवेष खान पठाण, तसेच बँकेचे संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्यासह बाबासाहेबांना मानणारा वर्ग, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, आमदार मा. देवरावजी भोंगळे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




