वरोरा :- विश्वशांती, मानवता आणि राष्ट्रवादाचा संदेश देणारे महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान असलेला ‘भारतरत्न‘ पुरस्कार त्वरित जाहीर करण्यातवा, या प्रमुख मागणीसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा यांच्या वतीने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांना नुकतेच एक अत्यंत आक्रमक आणि सर्वसमावेशक निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे राष्ट्रसंतांच्या राष्ट्रव्यापी कार्याची दखल केंद्र सरकारने तातडीने घ्यावी, असा जोरदार पुनरुच्चार करण्यात आला आहे.
🙏 निवेदनातील प्रमुख आणि आक्रमक मुद्दे 🙏
ग्रामगीता हेच मार्गदर्शक :- राष्ट्रसंतांनी ‘ग्रामगीता’ लिहून खेड्यांच्या स्वावलंबनाचा आणि विकासाचा जो दीपज्वल केला, तो आजच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा पाया आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसुधारणा :- केवळ अध्यात्मिक प्रबोधनच नव्हे, तर समाजात रुढ झालेली अंधश्रद्धा, जातीभेद आणि रूढी-परंपरांच्या विरोधात आयुष्यभर बुलंद आवाज उठवून त्यांनी समाजसुधारणेचा पाया रचला.
आझाद हिंद सेनेचे प्रेरणास्थान :- राष्ट्रसंतांच्या ओजस्वी आणि देशभक्तीपर भजनांनी लाखो युवकांना स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्यासाठी प्रेरित केले होते. महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत यांच्यातील वैचारिक जवळीक संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद होती.
जागतिक शांततेचेदूत :- जपानमधील जागतिक धर्म परिषदेत भारताच्या संस्कृतीचा आणि विश्वशांतीचा संदेश जगभरात पोहोचवणारे ते आद्य संत होते.
उपेक्षेबद्दल खंत :- कोट्यवधी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि राष्ट्रनिर्माणात अमूल्य योगदान दिलेल्या या महापुरुषाचा राष्ट्रीय पातळीवर योग्य तो सन्मान राखण्यास होत असलेला विलंब आता सहन करण्यापलीकडचा आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची आक्रमक भूमिका
यावेळी निवेदन स्वीकारताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या भूमिकेशी पूर्ण सहमती दर्शवली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळणे हा केवळ विदर्भ किंवा महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे, असे त्या स्पष्टपणे म्हणाल्या.
तसेच, संसदेच्या आगामी अधिवेशनात आणि थेट केंद्रीय स्तरावर हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय लावून धरू, अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा घेतलेल्या या मागणीसाठी प्रसंगी तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली, तरी मागे हटणार नाही, असा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.
या शिष्टमंडळात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी अनुयायी उपस्थित होते.




