ब्रह्मपुरी :-पक्षाच्या चांगल्या काळात अनेकजण सोबत असतात, मात्र पक्ष अडचणीत असताना निष्ठेने उभा राहणारा कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा आधार असतो. काँग्रेसच्या पडत्या काळात अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली, पण मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील तपाळ येथे आयोजित ब्रम्हपुरी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा.राम राऊत, खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, डॉ.राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉ.नितीन उराडे, हितेंद्र राऊत, दिनेश चिटनूरवार, रमाकांत लोधे, नितीन गोहणे, विजय गावडे, प्रमोद चौधरी, प्रफुल्ल खापर्डे, जुनेद खान, विजय घरत, सोनू नाकतोडे, किशोर शिंगरे, पुरुषोत्तम बगमारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपचे अनेक नेते सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत. धार्मिक भावना भडकवून आणि प्रभू श्रीरामांच्या नावाचा राजकीय वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. देशाच्या विकासासाठी काँग्रेसने केलेल्या योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
देशभर गावोगावी शाळा उभारण्यापासून शिक्षणाचा प्रसार करण्यापर्यंत, इस्रोसारखी जागतिक दर्जाची संस्था उभारण्यापासून देशात सक्षम शास्त्रज्ञ घडविण्यापर्यंत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. विकासाच्या या कामांमुळे देशाची प्रगती झाली आहे.
शेतकरी प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस शेतकऱ्यांप्रती नेहमीच संवेदनशील राहिली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडावे, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आवश्यकतेनुसार आंदोलनाची भूमिकाही घेतली आणि त्यानंतर प्रशासनाने कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन करत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आणि काँग्रेसची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




