सावनेर (प्रतिनिधी) :- नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका धडक कारवाईत सावनेर येथील एका महिलेच्या घरी छापा टाकून अमली पदार्थ ‘गांजा’ जप्त केला आहे. या कारवाईत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेसह तिला गांजाचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जवान सावनेर उपविभागात गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, किल्लापुरा, सावनेर येथील एका घरी महिला गांजाची विक्री करत आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पथकाने सापळा रचला. सावनेर पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून सदर महिलेच्या घराची झडती घेतली असता, तिथे गांजा (पाने, फुले, बिया) आढळून आला.
पोलिसांनी अटक केलेल्या महिलेकडे चौकशी केली असता, गांजाचा मुख्य पुरवठादार ‘पंकज गंगाधर पारवे’ (वय ४५, रा. हजारी पाहाड, गिट्टीखदान, नागपूर) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपूर येथून मुख्य आरोपी पंकज पारवे याच्या मुसक्या आवळल्या.
💥 २६ हजारांचा मुद्देमाल जप्त.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ४१५ ग्रॅम गांजा, विक्रीतून मिळालेली रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य असा एकूण २५,८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सावनेर पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) (ii) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजीतसिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे, प्रकाश ढोके, अमोल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल खरडकेले, अविनाश तोडसाम (अंमली पदार्थ विरोधी पथक) आणि सावनेर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्रीमती ऋतुजा जाधव यांच्यासह पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.




