चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्न व्यवसायिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अन्न सुरक्षेच्या बाबत अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलली असून, नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अनेक कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीत सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सुमारे ७० हून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरी व्यावसायिक उपस्थित होते. बैठकीत अन्न सुरक्षा आयुक्तांनी २३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, अन्न सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
💠 काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना 💠
👉 स्वयंपाकासाठी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे पूर्णपणे टाळावे.
👉 ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
👉 अन्न योग्य तापमानात साठवावे.
👉 कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी आणि सर्व आवश्यक परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे बाळगावीत.
👉 वर्तमानपत्रात अन्न देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
👉 पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
👉 कच्चे आणि शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे साठवावेत.
👉 तयार अन्नामध्ये कोणत्याही फूड कलरचा वापर करणे टाळावे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ आणि नियम व नियमन २०११ अंतर्गत हे सर्व नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाने सर्व अन्न व्यवसायिकांना दिले आहेत. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांनी वेळीच सावध होऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा कारवाई निश्चित आहे.




