वरोरा :- खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या हॉटेल व उपहारगृह चालकांसाठी आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे. प्रशासनाचे शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. “स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रामाणिकपणा हाच खरा व्यवसाय” हा संदेश देत, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
💠 व्यावसायिकांनी पाळावयाचे मुख्य नियम :-FSSAI लायसन्स अनिवार्य प्रत्येक हॉटेलमध्ये वैध FSSAI लायसन्स असणे बंधनकारक असून, ते दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.
💠 स्वच्छतेचा आग्रह :-किचन, भांडी आणि परिसर चकाचक असावा. कर्मचारी हेअर कप, ग्लोव्हज आणि स्वच्छ गणवेशात असणे बंधनकारक आहे.
💠 तेलाचा पुनर्वापर बंद :-वारंवार वापरलेले काळे तेल (Used Oil) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे तेल अधिकृत कलेक्टरकडे देणे किंवा योग्य पद्धतीने नष्ट करणे आवश्यक आहे.
💠 वृत्तपत्रात अन्न देणे टाळा :-खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात ठेवून देणे किंवा पॅक करणे पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
💠 एक्सपायरी डेट व भेसळ :- एक्स्पायरी झालेला किंवा भेसळयुक्त माल वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे.
💠 स्टोरेज व पेस्ट कंट्रोल :-कच्चे व शिजवलेले अन्न वेगळे ठेवावे, फ्रिजरचे तापमान योग्य असावे आणि हॉटेलमध्ये उंदीर, झुरळांपासून संरक्षण करण्यासाठी पेस्ट कंट्रोल करणे अनिवार्य आहे.
💠 ट्रॅसिबिलिटी :-सर्व खाद्यपदार्थांची खरेदी बिले जतन करावीत, जेणेकरून पदार्थांची विश्वासार्हता सिद्ध करता येईल.
💠 नियम मोडल्यास ‘हा’ असेल दणका :-प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जर वरील नियमांचे उल्लंघन झाले, तर केवळ दंडावरच भागणार नाही, तर परवाना निलंबन, हॉटेल सील करणे आणि संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यापर्यंतची कठोर कारवाई केली जाऊ शकते.
आता ‘प्रामाणिक व्यवसाय करा, ग्राहकांचा विश्वास जिंका’ या ब्रीदवाक्याचे पालन करून हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी लागणार आहे.




