Home Breaking News वणी परिसरातील प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्येवर राजू उंबरकर आक्रमक; अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी...

वणी परिसरातील प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्येवर राजू उंबरकर आक्रमक; अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वणी (यवतमाळ) :- वणी उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वेकोली व इतर कंपन्यांच्या कोळसा खदान , कोळसा सायडिंग आणि कोळशाच्या उत्खाननामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खाणीतून निघणाऱ्या धुळीचे कण हवेत मिसळल्यामुळे व वाढत्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना कॅन्सर, हृदयविकार आणि श्वसनाचे गंभीर आजार जडत असून, यावर मात करण्यासाठी वणी येथे तातडीने वेकोली कंपनीमार्फत अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनात राजू उंबरकर यांनी वणी परिसरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. वणी उपविभाग हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने राज्यात महत्त्वाचा भाग आहे. खाजगी व शासकीय कंपन्या याद्वारे करोडाचा नफा उत्पन्न करत असल्यातरी त्याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या वणी उपविभागातील अनेक गावांमध्ये हवेत मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ मिसळलेली दिसत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ, रस्त्यांची झालेली दुरावस्था, सायडिंग परिसरातील प्रदूषण आणि खाणींमधील स्फोट यांमुळे संपूर्ण वातावरण दूषित झाले आहे.
याप्रदूषणामुळे वणी परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार, दमा, सतत खोकला येणे, छातीत दुखणे, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, रक्तदाब, हृदयविकार तसेच फुफ्फुसाचा कर्करोग (कॅन्सर) आणि ब्रेस्ट कॅन्सर सारख्या अत्यंत गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत आहे. प्रदूषण केवळ हवेपुरते मर्यादित नसून, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि शेतीची जमीन देखील दूषित होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून, नागरिकांचे आरोग्य खालावण्यासोबतच त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावली आहे. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यंत मर्यादित सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना उपचारासाठी नागपूर, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. हा अवाढव्य खर्च परवडत नसल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची खंत राजू उंबरकर यांनी व्यक्त केली आहे.
वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक प्रदूषण लक्षात घेऊन वणी येथे वेकोली कंपनीमार्फत सर्व सुविधायुक्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तातडीने सुरू करण्यात यावे. या प्रस्तावित रुग्णालयात कर्करोग (कॅन्सर) विभाग, फुफ्फुस विकार विभाग, हृदयविकार विभाग, आपत्कालीन सेवा, आयसीयू (ICU), सीटी स्कॅन, एमआरआय (MRI) यांसारख्या सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. वणी उपविभागातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर आणि ठोस उपाययोजना कराव्यात. वणी उपविभागातील या गंभीर आणि जनहिताच्या विषयाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी मनसे नेते, राजू उंबरकर यांनी केली असून, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यासाठी तीव्र पावले उचलली जातील असा इशाराही या निवेदनातून मिळत आहे.