Home Breaking News जिल्ह्याबाहेर शेती असलेल्या शेतकऱ्यांवर संकट ; पीक कर्जापासून वंचित राहिल्याने शेतकरी चिंतेत.

जिल्ह्याबाहेर शेती असलेल्या शेतकऱ्यांवर संकट ; पीक कर्जापासून वंचित राहिल्याने शेतकरी चिंतेत.

वरोरा :-  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेने नवीन आदेश काढल्यामुळे, ज्या शेतकऱ्यांची शेती जिल्ह्याच्या सीमेबाहेर (शेजारील वर्धा जिल्ह्यात) आहे, त्यांना पीक कर्ज नाकारण्यात येत आहे. या अन्यायकारक निर्णयामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी वरोरा येथील सेवा सहकारी संस्थेचे सभासद आहेत. त्यांना दरवर्षी नियमाने पीक कर्ज मिळत होते आणि ते वेळेवर परतही करत होते. मात्र, सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेने नवीन अटी लागू केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे सातबारा उतारे शेजारील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील (उदा. साक्षात, पारडी, लाडकी गाव) आहेत, त्यांची माहिती बँक सॉफ्टवेअर स्वीकारत नाही. परिणामी, हे सर्व शेतकरी पीक कर्जासाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलनाचा इशारा
संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, ते अनेक वर्षांपासून वरोरा येथील संस्थेचे सभासद आहेत, तिथेच त्यांचे मतदान आहे आणि ते नियमित कर्जदारही आहेत. केवळ वडिलोपार्जित जमीन तांत्रिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्यात येत असल्याने कर्ज नाकारणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर पाणी फिरले असून, बियाणे आणि खते कशी खरेदी करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जर बँकेने या अटी त्वरित शिथिल केल्या नाहीत, तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सेवा सहकारी सोसायटीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांची मागणी
बँकेने ही जाचक अट त्वरित रद्द करावी आणि शेतकऱ्यांना पूर्ववत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. आता जिल्हा प्रशासन आणि बँक प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.