Home Breaking News मार्डा डॅम परिसरात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय, पोलिसांकडून...

मार्डा डॅम परिसरात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू

मारेगाव :- वर्धा नदीवरील मार्डा डॅम परिसरातील दाडगाव शिवारात एका ३५ ते ४० वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या युवकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याने, हा अपघात नसून हत्या असल्याचा गंभीर संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (५ जून) सकाळी दाडगाव येथील गौतम ठमके यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे काम सुरू होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर चालक नैसर्गिक विधीसाठी शेताजवळ गेला असता, त्याला एका खोलगट भागात तीव्र दुर्गंधी आली. जवळ जाऊन पाहिले असता, तिथे एका अनोळखी युवकाचा मृतदेह दिसून आला. चालकाने त्वरित ही माहिती शेतकरी गौतम ठमके यांना दिली आणि त्यानंतर पोलीस पाटलांमार्फत मारेगाव पोलिसांना या घटनेची वर्दी देण्यात आली.
पोलीस यंत्रणा सतर्क
घटनेची माहिती मिळताच वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम वानखेडे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
मृतकाची ओळख पटवण्यासाठी आवाहन
मृत युवकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याचे वर्णन खालीलप्रमाणे दिले आहे:
वय :- अंदाजे ३५ ते ४० वर्षे.
पेहराव :- नारंगी (शेंदरी) रंगाची हाफ टी-शर्ट आणि काळी लोअर पँट.
ओळख पटवणारी चिन्हे :-उजव्या हातावर विंचवाचे टॅटू, उजव्या हातात चांदीचे कडे, मनगटावर लाल धागा आणि उजव्या पायात काळा धागा.
हत्येचा संशय गडद
मृतदेह २-३ दिवस जुना असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असून, मृतदेहावरील जखमा पाहून हत्या झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, घटनास्थळापासून काही अंतरावरच चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असल्याने, दुसऱ्या जिल्ह्यात हत्या करून मृतदेह येथे आणून फेकला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सध्या मारेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.