Home Breaking News काँग्रेसला मोठा धक्का: उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शैलैश अग्रवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई;...

काँग्रेसला मोठा धक्का: उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शैलैश अग्रवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई; पक्षातून हकालपट्टी

मुंबई :-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एका महत्त्वाच्या निर्णयाद्वारे वर्ध्यातील नेते शैलैश अग्रवाल यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. पक्ष नेतृत्वाला कोणतीही पूर्वसूचना न देता, अंधारात ठेवून उमेदवारी मागे घेतल्याप्रकरणी शैलैश अग्रवाल यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी शैलैश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत अग्रवाल यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे पक्षाची मोठी कोंडी झाली आणि राजकीय स्तरावर पेच निर्माण झाला.
पक्षाची भूमिका
या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. “पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून उमेदवारी मागे घेतल्यामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या, ही बाब अत्यंत चुकीची आहे,” असे नमूद करत पक्षाने त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या कारवाईचे पत्र जारी केले आहे. या निर्णयामुळे वर्धासह संपूर्ण विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.