माझं आठवणीतलं गाव – अकोला
माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि समस्त ग्रामवासी अकोला नं.1 यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 फेब्रुवारी 2026 ला माजी विद्यार्थी स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने लिहिलेला हा खास लेख आहे. या लेखाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वरोरा तालुक्याच्या शेवटी वसलेले अकोला हे आमचे सुंदर, सुबक गाव. गावाच्या पूर्वेकडून वाहणारी इरई नदी, सभोवताली सुपीक जमीन, हिरवेगार रान, गावातील दर्शनी भागातून सुरू झालेले प्रशस्त रस्ते, सुंदर कौलारू घरे, चौक जणू काही नियोजनबद्ध बसवलेले—असे आमचे आदर्श गाव अकोला.
आमच्या या गावापासून अकोला ते चारगाव, अकोला ते राळेगाव, अकोला ते गुजगव्हाण, अकोला ते पारडी, अकोला ते गिरोला, अकोला ते सावरी आणि अकोला ते बोरगाव असे चारी बाजूंनी गावांना जोडणारे रस्ते होते. त्यावेळी कच्चे रस्ते असले तरी दळणवळण व संपर्कासाठी बैलगाडीने प्रवास करणे सोयीचे होते. दक्षिणेला हनुमान मंदिर होते. गावातील विठ्ठल-रुक्माईचे मंदिर हे गावाचे आराध्य दैवत होते. नित्यनेमाने भजन-पूजनाचे कार्यक्रम चालत असत. गावाला अध्यात्माची सुंदर जोड लाभली होती.
आमच्या गावात सर्व धर्म व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. या गावावर तुकडोजी महाराजांचे आशीर्वाद होते. त्यांचे शिष्य स्वर्गीय गणपतरावजी डवरे यांच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळामार्फत प्रबोधनाचे कार्य व प्रार्थना नित्यनेमाने होत असे. त्यातूनच गावाचा आदर्श व विकास साधला जात होता आणि त्याचा प्रभाव आबालवृद्धांवर पडत होता. त्यामुळे छोटे-मोठे भांडण-तंटे गावातच निस्तारले जात. गावातील कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल नव्हता. त्यामुळे तत्कालीन पोलीस पाटील स्वर्गीय नानाजी पाटील उमरे यांचा पोलीस स्टेशनमार्फत सत्कार करण्यात आला होता. यामुळे आमच्या गावाचा प्रभाव आजूबाजूच्या गावांवरही पडत असे.
या गावातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय स्वर्गीय तुळशीरामजी पाटील उमरे. ते त्या काळी पंचायत समिती, वरोरा येथील सभापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गाव एकजुटीने त्यांच्या कार्याला साथ देत होते.
गावातील कोणतेही सार्वजनिक किंवा घरगुती कार्य असो, संपूर्ण गाव आनंदाने सहभागी होत असे. विशेषतः या कार्यांचे नेतृत्व स्वर्गीय श्री सखारामजी नन्नावरे करीत असत. गावातील सर्व लोक एकमेकांचा आदर-सन्मान राखत असत—हीच आमच्या गावाची संस्कृती होती.
शैक्षणिक वातावरण
पूर्वीपासून या गावाला शिक्षणाचा वारसा लाभलेला होता. आम्ही लहान असताना स्वर्गीय श्री उमरे गुरुजी, स्वर्गीय श्री मटाले गुरुजी, स्वर्गीय श्री डाखरेजी आणि इतर अनेक शिक्षित मंडळी होती. त्यामुळे गावातील लोकांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण झाली होती.
गावातील आमची प्राथमिक शाळा लाखात एक होती, कारण शाळेला समर्पित आणि संस्कारी शिक्षक लाभले होते. माझ्या वेळेस श्री ठावरी गुरुजी व स्वर्गीय श्री नक्षीने गुरुजी माझे गुरुवर्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिक्षण घेत होतो आणि आमच्या शाळेचा लौकिक तालुका स्तरावर होता.
चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मी तालुक्यात प्रथम आलो होतो. पुढील वर्षी माझे लहान भाऊ श्री प्रभाकर मोडक तसेच श्री विनोद ठावरी यांना पब्लिक स्कूल, चिखलदरा येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. मात्र उशीर झाल्यामुळे विनोद ठावरी प्रवेश घेऊ शकले नाहीत.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर त्या शाळेत आमच्या गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ठसा स्पष्ट दिसत असे. सुंदर अक्षर ही आमच्या गावाची ओळख होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून यश संपादन केले आणि शासनाच्या सेवेत हातभार लावला. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर व विविध सेवांमध्ये कार्यरत झाले. त्यांपैकी बरेच जण आज निवृत्त झालेले आहेत.
गावातील लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असत. शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी सुट्टीमध्ये गावाला येऊन या सणांमध्ये सहभागी होत असत. दिवाळीच्या सुट्टीत सर्व तरुण मंडळी विविध मैदानी खेळांचे नियोजन करीत. यामध्ये विशेषतः श्री वासुदेव भाऊ मटाले, कमलाकर भाऊ उमरे, स्वर्गीय वसंत भाऊ उमरे, पुरुषोत्तम भाऊ उमरे, स्वर्गीय घनश्याम भाऊ उमरे, गुलाब भाऊ उमरे देविदास भाऊ बोथले आणि इतर मंडळी अग्रेसर असत.
आमच्या वयाचे मित्र शामराव मटाले, दामाजी मटाले, सुरेश वानकर, स्वर्गीय नरेश उमरे आणि इतर समवयस्क मित्रांचे वनभोजन इरई नदीच्या काठावर वर्षातून एकदा ठरलेले असायचे.
गावातील काही मंडळी तमाशा व नाटकांचे कार्यक्रम आयोजित करीत आणि गावकरी त्याचा भरपूर आनंद घेत. या कार्यक्रमासाठी दौलतराव कुमरे परिवार विशेषतः अग्रेसर असे.
अशा या सुंदर, समृद्ध व प्रगत गावाला नजर लागली. चारगाव धरणामुळे आमचे गाव सन १९७७-७८ मध्ये विस्थापित झाले आणि आमचे आदर्श गाव विखुरले गेले. तरीही या गावाविषयीचे प्रेम आमच्या हृदयात सदैव कोरलेले आहे.
अशा माझ्या महान, समृद्ध गावास शतकोटी प्रणाम!
आपल्या जुन्या गावाच्या आठवणी जागृत करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करणारे श्री अरुण उमरे व सर्व गावकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
भास्कर मोडक
सेवानिवृत्त अभियंता
नागपूर
(खूप आठवणीत असलेल्या काही निवडक आठवणी व अनुभव येथे मांडले आहेत.)




