नागपूर :
आनंद व्यक्त करणे म्हणजे लोककला असल्याचे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. क्षितिजा कदम यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या चौथ्या दिवशी गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्घाटन कार्यक्रमात डॉ. कदम मार्गदर्शन करीत होत्या.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. क्षितिजा कदम, व्यवस्थापन परिषद सदस्य वामन तुर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मंगला हिरवाडे, अधिसभा सदस्य दिनेश शेराम, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, सांस्कृतिक समन्वयक शm प्रकाश शुक्ला यांची उपस्थिती होती. पुढे मार्गदर्शन करताना लोकनृत्य कोण करतात आणि कधी केले जातात याची माहिती डॉ. क्षितिजा कदम यांनी दिली.
व्यवस्थापन परिषद सदस्य वामन तुर्के यांनी आयुष्य सुंदर करण्यासाठी कलारुपी अलंकार आपल्या जीवनात आवश्यक असल्याचे सांगितले. युवक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठात कला संगम साधला गेला असून आपल्या अंगी असलेल्या कलेत पारंगत होण्याचे आवाहन वामन तुर्के यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मंगला हिरवाडे यांनी प्रत्येक स्वर, ताल, रंग स्मरून आपले कला जीवन संवेदनशील बनविले पाहिजे, असे सांगितले. कला जीवन घडवीत असून युवारंग हा युवक महोत्सव सर्जनशीलतेचा उत्सव आहे. युवारंगातून भविष्यातील संस्कृतीची बीजे रुजली जाणार आहेत. आपण जोपासलेल्या छंदाला कमी समजू नका ही कला आपली ताकद असून यातून रोजगाराचे साधन प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत कलेला प्रेरणादायी बनविण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अधिसभा सदस्य दिनेश शेराम यांनी रंगात केवळ सातच रंग असून या ठिकाणी युवक कलेच्या माध्यमातून २२ रंगांची उधळण करीत असल्याचे सांगितले. वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेमुळे जगात भारताची विशिष्ट ओळख आहे. धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक संवाद लोककलेच्या माध्यमातून दिसून येतो, असे जगाच्या पाठीवर कोठेच दिसून येत नाही. लोककला जगाला भारताचे दर्शन घडवित आहे. आपण आपली सांस्कृतिक परंपरा जोपासली पाहिजे. पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक परंपरा कलेची जपवणूक करण्याची जबाबदारी आपली असल्याचे शेराम म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी मानले.




