Home Breaking News accident : कल्याणीनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी

accident : कल्याणीनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी

पुणे, 23 मे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात (In a juvenile detention center)रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे आदेश दिले.बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे, के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास बाल न्याय मंडळाने निकाल दिला. त्यानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.आरोपीला देण्यात आलेल्या जामिनाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने पोलिसांना बाल न्याय मंडळात अर्ज करण्याची सूचना केली होती. बाल न्याय मंडळात बुधवारी दिवसभर सुनावणी झाली.

कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातानंतर आरोपीविषयी समाजात रोष आहे. त्यातून त्याला इजा पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने बाहेर राहणे धोकादायक ठरू शकते, असे म्हणणे पोलिसांनी सादर केले. जामीन झाल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यासाठी काही बदल गरजेचे आहेत. त्यामुळे आता त्याला सुधारगृहात पाठवणे कायदेशीर नाही, असा युक्तिवाद मुलाचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी केला. लेखी आदेश मिळाल्यानंतर याबाबत अपील करण्यात येणार असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले.