भद्रावती :-गौतम नगर परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली होती. संध्याकाळनंतर घराबाहेर पडणेही कठीण झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले होते. या अत्यंत संवेदनशील व गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत नगरसेवक महेश मारोतराव जीवतोडे यांनी आक्रमक भूमिका घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि तातडीने कारवाईची मागणी केली.
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नगरसेवक महेश जीवतोडे यांनी या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, वनविभागाने विशेष मोहीम राबवून आज या बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले.
बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गौतम नगरमधील नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
“जनतेच्या सुरक्षेशी माझी कधीही तडजोड असणार नाही. नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर आवाज उठवून प्रशासनाकडून तत्काळ कारवाई करून घेणे हीच माझी पहिली जबाबदारी आहे. आज नागरिकांच्या जिवावर आलेले संकट टळल्याचा मनस्वी आनंद आहे. या मोहिमेत तातडीने सहकार्य करून यशस्वी कारवाई करणाऱ्या वनविभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
महेश मारोतराव जीवतोडे , नगरसेवक भद्रावती




