Home Breaking News चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद संपला; सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब.

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद संपला; सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब.

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या काँग्रेस पक्षांतर्गत ‘गटनेतेपदा’च्या वादावर अखेर पडदा पडला आहे. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे व कागदपत्रांची छाननी करत या प्रकरणावर अंतिम निकाल दिला आहे. या निकालात राजेश अडूर यांची गटनेतेपदाची नोंद अधिकृतपणे रद्द करण्यात आली असून, सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेतेपदावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महापालिका वर्तुळात गेल्या काही काळापासून गटनेतेपदावरून काँग्रेस पक्षांतर्गत तीव्र राजकीय सुंदरासुंदी सुरू होती. दोन्ही गटांकडून पक्षातील वॉर्ड आणि संख्याबळाच्या अधिकारासाठी कायदेशीर लढा दिला जात होता. प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी मांडण्यात आलेले युक्तिवाद, पक्षीय कागदपत्रे आणि कायदेशीर बाजू तपासल्यानंतर प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे.
या निकालानुसार राजेश अडूर यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांची गटनेतेपदावरील नोंद रद्द ठरवण्यात आली आहे. दुसरीकडे, सर्व तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेतेपदावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निर्णयामुळे आगामी महापालिका राजकारणात काँग्रेस पक्षांतर्गत नवीन राजकीय समीकरणांना वेग येणार असून, या निकालाचे दूरगामी परिणाम चंद्रपूरच्या राजकीय पटलावर उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.