Home जिल्हा गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडून पाहणी.अपूर्ण कामांबाबत अधिकाऱ्यांना फटकारले

गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडून पाहणी.अपूर्ण कामांबाबत अधिकाऱ्यांना फटकारले

गोसेखुर्द :- धरणाचे पाणी उजव्या कालव्याला तातडीने सोडण्यात यावे, अन्यथा कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत प्रशासनाने उजव्या कालव्यात पाणी सोडले. मात्र पाणी सोडले आहे म्हणून समाधान न मानता, प्रत्यक्षात पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता व मरारमेंढा गावानजीकच्या गोसेखुर्द उजव्या कालव्याची पाहणी केली.



पाहणीदरम्यान कालव्यावरील अनेक ठिकाणी बांधकामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास येताच आमदार वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. अपूर्ण कामांमुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला अडथळा निर्माण होणार असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सर्व कामे तातडीने पूर्ण करून कालव्यातील पाण्याचा प्रवाह अखंडित ठेवावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.



यावेळी आमदार वडेट्टीवार म्हणाले, मी जलसंपदा राज्यमंत्री असताना गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामासाठी तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. उजव्या कालव्याचे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र आजपर्यंत केवळ १५ टक्केच काम पूर्ण झाले आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे होऊन कामाला वेग द्यावा. ऑक्टोबर २०२६ पर्यंत कालव्याचे काम पूर्ण झाले नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठे जनआंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला मी गप्प बसून पाहणार नाही. प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक लढाई लढली जाईल.



पाहणीदरम्यान त्यांनी कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी बांधकामे अपूर्ण आहेत, ती युद्धपातळीवर पूर्ण करून पाण्याचा पुरवठा अखंडित ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यालाही पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी घोडाझरी कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास मोरे तसेच गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे सहाय्यक अभियंता जितेंद्र मडावी, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, न.प.उपाध्यक्ष डॉ.नितीन उराडे उपस्थित होते.



गोसेखुर्द प्रकल्पाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा, सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे आणि रखडलेल्या कामांना गती मिळावी, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा स्पष्ट इशारा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.