वरोरा :- वरोरा पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई करत १३ मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०४/०७/२०२६ रोजी फिर्यादी अमोल दयाराम भोग (वय ३२, रा. वैष्णो नगर, वरोरा) यांची ४०,००० रुपये किमतीची मोटारसायकल (क्र. एमएच. ३४ बी.के. ५५२७) चोरीला गेली होती. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल (अप क्र. ७८९/२०२६, कलम ३०३(२) भा. न्या. स. २०२३) करण्यात आला होता. वरोरा शहरातून यापूर्वीही वारंवार मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या.
💥 तपास आणि कारवाई 💥
गुन्हा दाखल होताच वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांनी तातडीने सपोनी शरद भस्मे व पोलीस पथकाला आरोपींचा शोध घेण्याबाबत निर्देश दिले. पोलिसांनी वरोरा शहरातील ५० आणि नागपूर-चंद्रपूर हायवेवरील ७० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी वरोरा शहरातून चोरलेल्या एकूण ११ मोटारसायकली वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली.
या टोळीतील आरोपी प्रमोद रामकृष्ण हेपट याने बनावट आर.सी. तयार करून आरोपींना दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून बनावट आर.सी. आणि दोन मोटारसायकली असा एकूण १,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १३ मोटारसायकली (किंमत ६,४०,००० रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत.
💥 अटक करण्यात आलेले आरोपी 💥
१. हेमंत विनोद चौधरी (वय ३५, रा. शिंगोव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा)
२. सुरज एकनाथ उमरे (वय २८, रा. दहेगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर)
३. प्रमोद रामकृष्ण हेपट (वय ३५, रा. खांजी वार्ड, वरोरा, जि. चंद्रपूर)
👉 कारवाईत यांचा सहभाग
ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के व सपोनी शरद भस्मे यांनी केली. या मोहिमेत पोलीस स्टाफमधील सुखराज यादव (ब.न. ७११), संदिप मुळे (ब.न. २५७१), प्रशांत नागोसे (ब.न. २५७८), अमोल नवघरे (ब.न. ९२४), नितीन रायपुरे (ब.न. २५४९), मनोज ठाकरे (ब.न. १३९९), विशाल राजुरकर (ब.न. ०१), सौरभ कुलते (ब.न. १०५३) आणि महेश गावतुरे (ब.न. २६४३) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




