वरोरा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकत्याच जाहीर केलेल्या ब्लॉक अध्यक्षांच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांमध्ये वरोरा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निलेश भालेराव यांची वर्णी लागली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास त्यांच्या आतापर्यंतच्या निष्ठावान कार्याची पावती मानली जात आहे.
निलेश भालेराव हे वरोरा शहरातील एक आक्रमक आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी रस्त्यावर उतरणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या नियुक्तीमुळे वरोरा शहर काँग्रेसला एक नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असून, आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्या अधिकृत पत्रकानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. निलेश भालेराव यांच्या नियुक्तीनंतर समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, काँग्रेस पक्ष आता वरोरा शहरात अधिक जोमाने सक्रिय होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आक्रमक स्वभाव आणि जनसंपर्क असलेल्या निलेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष वरोरा शहरात कोणती नवी उंची गाठतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




