Home Breaking News प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विश्वास झाडेची नवोदयसाठी निवड

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विश्वास झाडेची नवोदयसाठी निवड


नांदाफाटा : – जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विश्वास प्रेम झाडे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करत निवड मिळविली आहे. त्याच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विश्वासने कठोर मेहनत, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. आर्थिक व सामाजिक अडचणींवर मात करत त्याने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




विश्वासच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष शामसुंदर राऊत, कोषाध्यक्ष रवींद्रलाल श्रीवास्तव, प्राचार्या अलेक्झांडरीना डिसूजा, सचिव पौर्णिमा श्रीवास्तव, उपाध्यक्ष विनय श्रीवास्तव, उपप्राचार्य रत्नाकर चटप तसेच मार्गदर्शक शिक्षक सचिन सातपुते यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास व्यक्त केला. विश्वास झाडेच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी अशाच प्रकारे यश संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

🙏 विशेष प्रतिनिधी :- ✍️ प्रमोद खीरटकर 🙏