पुणे :- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवत, विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी (दि. २९) हा ऐतिहासिक निकाल दिला.
या खटल्यातील आरोपीचे कृत्य अत्यंत अमानवी, क्रूर आणि समाजमनाला हादरवून टाकणारे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आरोपीने केलेल्या क्रूरतेची तीव्रता, पीडितेचे वय आणि समाजावर झालेला गंभीर परिणाम लक्षात घेता, हे प्रकरण “रेअर ऑफ द रेअर” (दुर्मिळातील दुर्मिळ) श्रेणीत मोडते, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
💠अशी होती जलद कारवाई 💠
या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आला. अवघ्या १६ दिवसांत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आणि सुमारे ५५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
न्यायालयाने निकालात नमूद केले की, पीडित मुलगी अत्यंत असहाय्य अवस्थेत होती. उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब आरोपीविरुद्ध अत्यंत ठोस ठरले. याव्यतिरिक्त, आरोपीचा पूर्वीचा इतिहासही गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.
सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध अत्यंत कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचा आधार देत फाशीची मागणी केली होती. या जलद सुनावणीमुळे हा खटला राज्यातील अत्यंत वेगाने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक मानला जात आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर पीडित कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.




