Home Breaking News वणीत जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३० मोठमोठी वृक्षांच्या कत्तलीचा प्रस्ताव; मनसे पक्ष नेते राजू...

वणीत जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३० मोठमोठी वृक्षांच्या कत्तलीचा प्रस्ताव; मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा..!

वणी :- सध्या वणी विभागामध्ये मोठ्या कंपन्या येऊन विकासाच्या नावाखाली या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची नासधूस केली जात आहेच. एकीकडे या खाजगी कंपन्यांमुळे वणी विभागातील हिरवाई नष्ट होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला असल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. आता चक्क शहरातील नगर परिषदेने देखील हाच झाडे तोडण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. ज्या प्रशासनाने शहराचे पर्यावरण जपायला हवे, तेच प्रशासन आता वृक्षतोडीच्या तयारीत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वणी शहरातील स्थानिक सावित्रीबाई फुले चौक परिसरातील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रासाठी तब्बल ३० मोठमोठी वृक्षे तोडण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने जाहीर केला असून, या कत्तलीविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी थेट रणशिंग फुंकले आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीने वणी नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना एक खरमरीत निवेदन सादर करण्यात आले आहे. नगर परिषदेने ५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानुसार, सावित्रीबाई फुले चौक परिसरात नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी सुमारे ३० मोठमोठी वृक्षे तोडण्याचे प्रस्तावित केले आहे. यावर शहरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून राजू उंबरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विकासकामांच्या नावाखाली झाडांची कत्तल करणे अत्यंत चुकीचे आहे. ही झाडे अनेक वर्षांपासून वणी शहरातील पर्यावरण संवर्धन, तापमान नियंत्रण आणि प्रदूषण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागरिकांना सावली देणाऱ्या या हिरवाईवर कुऱ्हाड चालवण्यापूर्वी नगर परिषदेने कोणत्याही पर्यायी जागेचा गांभीर्याने विचार केलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे प्रस्तावित ३० मोठमोठी वृक्षे तोड तात्काळ थांबवण्यात यावी. जलशुद्धीकरण केंद्रासाठी इतर कोणत्या पर्यायी जागा उपलब्ध असू शकतात, याचा अभ्यास अहवाल सार्वजनिक करावा. यासंदर्भातील वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी, सर्वेक्षण अहवाल आणि संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावीत. या विषयावर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी खुली सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात यावी. या प्रकल्पाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर अहवाल (Environmental Impact Assessment) जाहीर करावा.
प्रशासनाने तात्काळ या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जर प्रशासनाने लोकभावना आणि पर्यावरणाचे महत्त्व लक्षात न घेता मनमानी कारभार सुरूच ठेवला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी शहरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढाईसह सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार असेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.