वरोरा :- अभिषेक भागडे
भीषण उन्हाळ्यात वरोरा शहर सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. मात्र, ही टंचाई नैसर्गिक नसून ती प्रशासन आणि ‘विदर्भ मल्टीसर्विसेस’ या कंत्राटदाराच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधातून निर्माण झालेली मानवनिर्मित समस्या असल्याचे चित्र दिसत आहे. कोट्यवधींच्या निविदा निघूनही कंत्राटदाराने कामे अर्धवट सोडली असताना, प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी मेहेरबानी का दाखवत आहे? असा संतप्त सवाल आता वरोरावासीय विचारत आहेत. या गंभीर प्रकरणी नगर परिषदेचे गटनेता नगरसेवक अक्षय दिलीप भिवदरे यांनी आक्रमक पवित्रा घेत कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.
🔴 कंत्राटदाराचा ‘विदर्भ’ थाट; प्रशासनाचे डोळे झाक
वरोरा नगर परिषद अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र आणि तुळाणा पंप हाऊस येथील नवीन पंप खरेदी व इतर कामांचे कंत्राट ‘विदर्भ मल्टीसर्विसेस’ला देण्यात आले होते. परंतु, या कंत्राटदाराने अत्यंत निष्काळजीपणा दाखवत कामे अर्धवट स्थितीत लटकवून ठेवली आहेत. तुळाणा पंप हाऊस येथील ४० HP क्षमतेचा मुख्य पंप गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी किंवा संबंधित अभियंता या कंत्राटदाराला नोटीस बजावण्याचे धाडस का दाखवत नाहीत? यामध्ये अधिकारी आणि कंत्राटदाराचे ‘साठे-लोटे’ तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
🔴 जनतेचे हाल, प्रशासन मालामाल?
तुळाणा पंप हाऊस येथे कार्यान्वित असणे अपेक्षित असलेल्या ३ पंपांपैकी केवळ १ पंप सुरू आहे. भर उन्हाळ्यात एका पंपावर संपूर्ण शहराचा डोलारा कसा पेलणार? यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एकीकडे सामान्य जनता थेंब-थेंब पाण्यासाठी तरसत आहे आणि दुसरीकडे कंत्राटदार मात्र कामे पूर्ण न करता प्रशासकीय आशीर्वादाने मोकाट फिरत आहे.
🔴 अक्षय भिवदरे यांचा निर्वाणीचा इशारा: आता थेट उपोषण ! 🔴
या संदर्भात अक्षय भिवदरे यांनी मुख्यधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
1. 👉कंत्राट रद्द करा विदर्भ मल्टीसर्विसेसचा ठेका तात्काळ रद्द करून त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकावे.
2. 👉दंडात्मक कारवाई कामात दिरंगाई केल्याबद्दल कंत्राटदाराकडून मोठा दंड वसूल करावा.
3. 👉फेरनिविदा नवीन आणि कार्यक्षम कंत्राटदाराची नियुक्ती करून अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत.
👉 *”प्रशासनाने जर या कंत्राटदाराचे लाड थांबवले नाहीत आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन आणि उपोषण छेडावे लागेल. उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.”
👉अक्षय दिलीप भिवदरे (नगरसेवक तथा गटनेता, भाजपा, वरोरा)
👉 आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी दाद
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या निवेदनाच्या प्रती आमदार श्री. करणदादा संजय देवतळे आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. वरोराकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदाराला प्रशासन आता तरी वठणीवर आणणार की, ‘अर्थपूर्ण’ शांतता पाळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




