Home जिल्हा रोटरी क्लबच्या आरोग्य शिबिरातून कॅन्सरविरोधी लढ्याला बळ

रोटरी क्लबच्या आरोग्य शिबिरातून कॅन्सरविरोधी लढ्याला बळ

रोटरी क्लबच्या आरोग्य शिबिरातून कॅन्सरविरोधी लढ्याला बळ
वरोऱ्यात ७५ नागरिकांची मोफत तपासणी, समाजोपयोगी उपक्रमास मोठा प्रतिसाद
वरोरा :- अभिषेक किशोरराव भागडे

समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या रोटरी क्लब वरोरा यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला वरोरा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ७५ नागरिकांनी तपासणी करून घेत आरोग्याबाबत जागरूकतेचे उदाहरण ठेवले.
हे शिबिर टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. शिबिरामध्ये अनुभवी वैद्यकीय पथकाने नागरिकांची प्राथमिक तपासणी केली. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे वेळीच निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असून, अशा शिबिरांमुळे सामान्य नागरिकांना मोफत व तज्ज्ञ मार्गदर्शन मिळत आहे.
शिबिरासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी डॉ. आशिष बरब्दे (DPM), सूरज साळुंके (DPC), डॉ. ट्विंकल ढेंगळे (दंतचिकित्सक), काजल विश्वास (SN) व वैष्णवी सहारे (DEO) यांच्या पथकाने केली.
या उपक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक तेला, डॉ. प्रशांत खुळे, अभिजित मणियार, अभिजित बोथले, दीपाली माटे, अदनान सद्दीकोट उपस्थित होते. तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष प्राजक्ता डोंगरवारसचिव संध्या बारई यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले.
शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांचे अहवाल दोन दिवसांत उपलब्ध होणार असून, अहवालानंतर आवश्यक रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब वरोरा व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमामुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता वाढत असून, गरजू नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळत आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.