चंद्रपूर :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी ‘TEENS’ (Teachers Educating, Empowering & Nurturing Students) जनजागृती कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत ९२६ मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोटरी क्लबचे ६७ सदस्य, १५ बँक कर्मचारी तसेच विशेष किशोर पोलीस युनिट (SJPU) आणि भरोसा सेलचे ६४ पोलीस अधिकारी व अंमलदार, अशा एकूण १,०७२ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्रीमती वसुमाना पंत (भा.प्र.से.) होत्या. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (भा.पो.से.) प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अपर मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी (भा.पो.से.), शिक्षणाधिकारी तसेच रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा रोटे. स्मिता विततोडे, सचिव रोटे. विशाल खांडरे व वरिष्ठ रोटेरियन उपस्थित होते.
POCSO कायद्याबाबत शिक्षकांना सजगतेचा इशारा :- पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी POCSO कायद्याच्या विविध तरतुदी, शाळांची जबाबदारी आणि बालकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शाळांनी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे आणि पीडित बालकाची ओळख गोपनीय ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. POCSO कायद्याच्या कलम १९ अंतर्गत गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक असून माहिती लपविल्यास शिक्षेची तरतूद असल्याचे सांगत चाइल्ड हेल्पलाइन १०९८चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेपासून तणाव व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन :- क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट श्रीमती मानसी मोरे नोपाणी (Happy Heads) यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या भावनिक व वैचारिक स्थितीवर मार्गदर्शन केले. योग्य निर्णय घेण्यासाठी ‘Stop-Think-Choose’ सूत्र, सहानुभूतीपूर्ण संवाद, मानसिक अडचणींची लक्षणे तसेच शिक्षकांसाठी तणावमुक्तीसाठी ग्राउंडिंग तंत्र आणि कृतज्ञता भाव याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सायबर गुन्ह्यांच्या नव्या जाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा :- सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अली यांनी डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांवर प्रकाश टाकला. डिजिटल अरेस्ट, बनावट APK मालवेअर, व्हॉट्सअॅप हॅकिंग, फिशिंग, टास्क फ्रॉड, सेक्सटॉर्शन, ऑनलाइन गेमिंग, डीपफेक आणि शेअर मार्केट फसवणूक यांसारख्या प्रकारांबाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले.सायबर सुरक्षिततेसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर, अनधिकृत कॉल फॉरवर्डिंग रद्द करण्यासाठी #002#, हरवलेला मोबाईल ब्लॉक व ट्रॅक करण्यासाठी CEIR, संशयास्पद कॉल व संदेशांची माहिती देण्यासाठी Chakshu, तसेच M-Kavach 2 अॅपचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० हेल्पलाइन किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.
‘योगामुळे तणावमुक्त जीवन’ — संदीप पाटील
विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी POCSO कायदा, सायबर सुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र या तिन्ही विषयांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. योगाभ्यास आणि प्राणायामामुळे जीवन तणावमुक्त राहते, असे सांगत शिक्षकांनी स्वतः नियमित योगसाधना अंगीकारून सकारात्मक व आनंदी वृत्तीने विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी वसुमाना पंत आणि अपर मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी शिक्षक, पोलीस आणि प्रशासनाच्या या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा रोटे. स्मिता विततोडे यांनी केले. स्वागत व आभार रोटे. विशाल खांडरे यांनी मानले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रथा वाडेकर यांनी केले.
‘TEENS’मधून शिक्षकांना सुरक्षा कवचाचे प्रशिक्षण :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसमोर उभ्या ठाकलेल्या कायदेशीर, मानसिक आणि सायबर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना सज्ज करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणून या कार्यशाळेकडे पाहिले जात आहे. POCSOपासून सायबर फसवणुकीपर्यंत आणि किशोरवयीन मानसिकतेपासून तणाव व्यवस्थापनापर्यंत विविध पैलूंवर एकाच व्यासपीठावर मार्गदर्शन झाल्याने ‘TEENS’ उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.




