वरोरा :- विद्यार्थ्यांचे हक्क, न्याय आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वरोरा शहर पुन्हा एकदा पेटून उठले आहे. आज वरोरा येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका भव्य व ‘लक्षवेधी निदर्शने आंदोलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा या आंदोलनातून अत्यंत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनातील प्रमुख मागण्या व आक्रमक पवित्रा
पारदर्शक शिक्षण व्यवस्था :- देशातील शिक्षण प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यात यावी.
अन्यायकारक धोरणे रद्द करा :- विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्यांच्या भविष्याशी खेळणारी अन्यायकारक शैक्षणिक धोरणे तात्काळ रद्द करावीत.
निष्पक्ष चौकशी :-NEET प्रकरणातील संपूर्ण गैरव्यवहाराची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी व्हावी.
शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा :- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि जबाबदारी झटकणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे , असा एकमुखी आणि ठाम सूर या आंदोलनातून उमटला.
“विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच अधिक तीव्र केला जाईल.”
जनसामान्यांचा मोठा सहभाग
समस्त वरोरा तालुका परिवार, आजी-माजी विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि निषेध फलकांनी संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर दुमदुमून गेला होता. प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाची जारिव करून देत हा लढा विजयापर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यापर्यंत असाच अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.




