Home जिल्हा संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा श्रेष्ठ : नंदकिशोर खिरटकर लोकमान्य प्राथमिक विद्यालयातील पालक-शिक्षक...

संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा श्रेष्ठ : नंदकिशोर खिरटकर लोकमान्य प्राथमिक विद्यालयातील पालक-शिक्षक चर्चा सत्रात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांच्या भूमिकेवर भर

वरोरा : मुलं आपल्या बोलण्यापेक्षा वागण्यातून अधिक शिकतात. ती आपल्या पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे मुलांसाठी संपत्तीचा नव्हे, तर संस्कारांचा वारसा ठेवणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. संपत्ती काही काळ टिकते; मात्र संस्कारांचा वारसा अनेक पिढ्या घडवतो,असे प्रतिपादन पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर खिरटकर यांनी केले.



लोकमान्य प्राथमिक विद्यालयात दि. २१ जुलै रोजी पालक-शिक्षक संघाच्या वतीने आयोजित पालक-शिक्षक चर्चा सत्रात ते बोलत होते. पावसाची पर्वा न करता पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक उमेश लाभे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव करत सांगितले की, सन १९८१ मध्ये या शाळेत पहिला पालक संघ स्थापन करण्यात आला. परिसरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ही अशी एकमेव मराठी शाळा आहे की, जिथे विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अनेकदा ‘प्रवेश बंद’च्या पाट्या लावाव्या लागतात. ही बाब शाळेवरील पालकांचा विश्वास दर्शविते. त्यांनी मुलांना केवळ शिक्षण देणे पुरेसे नसून त्यांच्यासोबत वेळ घालवणे, संवाद साधणे आणि प्रामाणिकपणा, माणुसकी, शिस्त, सामाजिक जाणीव यांसारख्या जीवनमूल्यांचे संस्कार करणेही तितकेच आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.



अध्यक्षीय भाषणात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष घुमे यांनी शिक्षण व्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. आज शिक्षकांना अध्यापनापेक्षा विविध शासकीय व प्रशासकीय कामांचा अधिक भार सांभाळावा लागत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनीही या प्रश्नाबाबत जागरूक होऊन आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशिष घुमे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक उमेश लाभे, तर मंचावर पालक-शिक्षक संघाच्या सचिव तथा शिक्षिका रजनी गोंडे उपस्थित होत्या. प्रास्ताविक रजनी गोंडे यांनी केले. यावेळी नवनियुक्त पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपालू बालपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हिना कन्नोजवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षक रामभाऊ घोरुडे, लिपिक सुरेश बरडे, उज्ज्वला गुरुनुले आणि अनंता आमटे यांनी सहकार्य केले.