भद्रावती :-गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त तसेच स्व. महादेवराव लक्ष्मण पावडे आणि स्व. सिंधुताई महादेवराव पावडे यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीत मैफिल’ (वर्ष ८ वे) या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीताची मेजवानी, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आणि मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याने परिसरातील रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत जय गुरुदेव लॉन, बंगाली कॅम्प रोड, भद्रावती येथे हा कार्यक्रम होणार असून, आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात स्नेहसंमेलनासह दर्जेदार शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्रीराम तोडासे तसेच दैनिक सह्याद्रीचा राखणदार चे वरिष्ठ संपादक डॉ. यशवंत घुमे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय भद्रावती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नगरसेवक योगेश गाडगे, अनिल पडोळे आणि नगरसेविका लक्ष्मीताई बेहरे या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात झी मराठी फेम कु. भाग्यश्री खानोडे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यांना श्री. पूर्णाजी खानोडे (यवतमाळ) यांचे साथसंगत लाभणार असून, विशेष वाद्यसाथ म्हणून पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य व ज्येष्ठ बासरीवादक श्री. रवींद्र खंदारे सहभागी होणार आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी ही मैफिल विशेष आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मयूरा अवताडे व श्री. दशरथ महादेवराव पावडे यांनी केले असून, श्री. सचिन महादेवराव पावडे, सौ. सोनाली आणि कु. गोजिरी, (चि. स्वरंग) यांनी उपस्थित राहण्याचे स्नेहपूर्ण निमंत्रण दिले आहे.




