Home Breaking News शेतकऱ्यांच्या हक्काचा विजय! आ. विजय वडेट्टीवारांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासन झुकले; उद्यापासून गोसेखुर्दचे...

शेतकऱ्यांच्या हक्काचा विजय! आ. विजय वडेट्टीवारांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासन झुकले; उद्यापासून गोसेखुर्दचे पाणी मिळणार.

ब्रह्मपुरी :- गोसेखुर्द धरणातून सिंचनासाठी पाणी न सोडल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा देणाऱ्या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांची दखल घेत, उद्या, १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता गोसेखुर्दचे पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे.




पाण्याअभावी पिके करपली, शेतकरी होते संकटात
ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड आणि सावली परिसरातील हजारो शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईमुळे गंभीर संकटात सापडले होते. पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य पिके करपू लागली होती, ज्यामुळे बळीराजा हवालदिल झाला होता. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आ. विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा होणाऱ्या जनआक्रोशाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल,” असा सज्जड दम त्यांनी दिला होता.




एकाच दिवसात निर्णय, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आ. वडेट्टीवारांच्या या इशाऱ्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे उद्यापासून कालव्यात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीला दिलासा मिळणार असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
👉 “हा विजय माझा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय्य हक्काचा आहे. प्रशासनाने आता योग्य निर्णय घेतला असला, तरी भविष्यात शेतकऱ्यांना पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी रस्त्यावर उतरावे लागू नये, याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. तसेच, गोसेखुर्द कालव्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा,” अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.




जनतेचा सेवक’ म्हणून कर्तव्य बजावण्यावर भर
लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना केवळ प्रश्न मांडणे नव्हे, तर ते सोडवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे आ. वडेट्टीवार यांनी म्हटले. “लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे आणि त्याने जनहितासाठी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे,” ही भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
आ. वडेट्टीवारांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे सिंचनाचा मोठा प्रश्न सुटला असून, त्यांच्या कार्यशैलीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.