महाकाली कॉलनी, कॅन्टीन चौक येथे वाणीताई सदालावार यांच्या नेतृत्वात भाजपा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. कार्यक्रमाला माजी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रामपाल सिंग, बीबी सिंग, श्री. तिवारी, ओमेश्वर नंदनवार, वीरेंद्रसिंग ठाकूर, मनीष सिंग, ब्रिजेश सिंग, विनोद यादव, महेश झिटे, सिंधुताई राजगुरे, सचिन कुकडे, अमित निरंजने आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. “भारतीय जनता पार्टी हा केवळ एक राजकीय पक्ष नसून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारा ‘परिवार’ आहे,” असे त्यांनी सांगितले. विविध जाती-धर्मातील लोकांचा सहभाग असलेले चंद्रपूर व बल्लारपूर हे मतदारसंघ ‘छोटा भारत’ असल्याचे नमूद करत, सर्वसमावेशकतेच्या विचारावर भाजपाची वाटचाल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘भाजपाने कधीही दिशाभूल करणारे राजकारण केले नाही, तर विकासाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकण्याचे काम केले आहे. कोणत्याही धर्म, जात किंवा समाजाचा नागरिक माझ्या कार्यालयात आला, तर त्याचे काम प्रामाणिकपणे केले जाते.’ अलीकडेच ईदनिमित्त मुस्लिम बांधवांसाठी खीर-कोरमा, साहित्य वाटप तसेच गरजू रुग्णांना नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी मदत देण्याचे कार्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
⭕ गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी कटिबद्ध ⭕
गरिबांच्या सन्मानासाठी भाजप सदैव कटिबद्ध असून, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, रस्ते व पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गरीब कुटुंबांना पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना पक्की घरे देण्याचा निर्णय घेतला असून, म्हाडा अंतर्गत १० हजार घरांना मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात २००४ घरे मंजूर झाली असून येत्या वर्षभरात ती लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याची माहिती आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
⭕ महिला सक्षमीकरणावर भर ⭕
महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना त्यांनी ‘नारी ते नारायणी’ या संकल्पनेवर भर दिला. बल्लारपूर येथे उभारण्यात येत असलेल्या एसएनडीटी महिला सक्षमीकरण केंद्रातून महिलांना कौशल्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तसेच पोंभूर्णा येथे सुरू असलेल्या टूथपिक प्रकल्पातून महिलांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. वाणीताई सदालावार यांच्या नेतृत्वाखाली या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
⭕ जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा ⭕
निराधार योजना, श्रावणबाळ योजना, जीवनदायी योजना तसेच आयुष्यमान भारतसारख्या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत मदत पोहोचवणे हीच खरी जनसेवा आहे आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले. या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. समाजातील निराधार, वृद्ध, आजारी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या योजनांचा लाभ मिळवून देताना कार्यकर्त्यांनी संवेदनशीलता आणि तत्परता दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
⭕ गरिबांच्या उन्नतीतून आत्मनिर्भर भारत ⭕
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर काम करणे आवश्यक असून, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि गरिबांच्या उन्नतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. शासनाच्या योजना आणि संघटनेची ताकद यांची जोड देऊन सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच आपले ध्येय असावे, असेही आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.




